अकोला - जिल्ह्यांमध्ये सापडलेल्या पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या घरीच चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. यामध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांनी साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी चोरी गेलेल्या ऐवजाच्या पावत्या आवश्यक असल्याने त्या मिळणे शक्य नसल्याने प्रकरण सध्यातरी चौकशीत ठेवण्यात आले आहे.
बैदपुरा येथे जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण निघाल्यामुळे आरोग्य विभाग व पोलिसांनी मिळून रुग्णासह त्याच्या नातेवाईकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल दाखल केले आहे. त्यामुळे रुग्णाच्या घराला कुलूप असल्याने या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी रुग्णाच्या घरातील साडेआठ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यांनी सोन्या चांदीचे दागिने, रोख रकमेसह इतर महागड्या सात ते आठ वस्तू चोरून नेल्या. रुग्णाचे नातेवाईक हे सकाळी त्यांच्या घरी गेले असता घराचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी याबाबत सिटी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी गेले असता त्यांनी आतमध्ये आत जाण्याचे टाळले. त्यामुळे पोलिस पुढील कारवाई करू शकले नाही.
पोलिसांनी तक्रार दाखल करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकास चोरी गेलेल्या वस्तूंची पावती मागितली. परंतु, नातेवाईकांनीही पावत्या देण्यास हतबलता दाखवल्याने गुन्हा दाखल झालेला नाही. सध्या प्रकरण चौकशीत आहे. जोपर्यंत हे घर निर्जंतुकीकरण होत नाही, तोपर्यंत सर्वच जण घरात जाण्यास टाळाटाळ करीत आहेत. याबाबत सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.