अकोला- एप्रिल महिना मध्यात आल्याने अकोल्याच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. सोमवारचे कमाल तापमान 43.8 अंश तर किमान तापमान 23.7 अंशावर होते. उकाडा वाढत असल्याने नागरिकांची घरबसल्या काहीली होत आहे. यामुळे त्यांच्या मनस्थितीचाही पारा चांगलाच वाढला आहे.
वेधशाळेने 3 ते 6 एप्रिल दरम्यान जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणे काही दिवस ढगाळ वातावरण होते. त्यानंतर मात्र तापमानात वाढ होत गेली. दिवसेंदिवस वाढणारे तापमान 7 एप्रिलला 40.8 अंश, 8 एप्रिलला 40.2 अंश, त्यानंतरच्या दिवसांमध्ये अनुक्रमे 41.3, 41.8, 42.0 तर 42.8 अंश असे होते. हवामान खात्याने आणखी तीन-चार दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, तापमान वाढल्याने कोरोना विषाणूचा प्रभाव कमी होतो, असे म्हणण्यात येत होते. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला आहे.