अकोला - दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन येथील तबलिग-ए- जमातमध्ये अकोल्यातील 10 जण सहभागी झाल्याची शक्यता आहे. या 10 जणांचा पोलिसांनी शोध घेतला असून यामधील चौघांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. तसेच यातील 1 जण परदेशात गेला असून दोघे दिल्लीला गेले असल्याची माहिती आहे. तसेच इतर दोघे हे मुंबईचे असल्याची माहिती, पोलीस विभागाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या बैठकीत दिली.
या बैठकीत आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, महापौर अर्चना म्हैसणे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अकोल्यातून दिल्लीला गेलेल्या 9 जणांपैकी 4 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी तिघांना घराच्या बाहेर निघण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तर एकाला आरोग्य तपासणीनंतर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर दोघेजण हे मुंबईचे आहेत. तसेच इतर दोघे हे दिल्लीला परत गेले आहेत. एक बार्शीटाकळी येथील व्यक्ती हा परदेशात गेला असल्याचे माहिती पोलीस निरीक्षक सोळंके यांनी बैठकीत दिली.
दरम्यान, हे सर्व नागरिक दिल्ली येथील मरकझमधील कार्यक्रमात सहभागी होते किंवा नाही, याबाबत तपास करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत अकोल्यामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण मिळालेला नाही.