अकोला - जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांच्या प्रचार सभेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या सभेला वंचितचे युवा नेते तथा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी बाळापूर आपला बालेकिल्ला असून वंचितचे वादळ उभे राहिले असताना बाळापुरात किती राडा होणार या विचार करा म्हणत नागरिकांशी संवाद साधला. तसेच विकासाच्या मुद्द्यावरून सरकारची निवडणुकीमधील 5 वर्षांच्या आश्वासनांची पुणेरी भाषेत टर उडवली.
बाळापुर आपला बालेकिल्ला राहिलेला आहे. वंचित वादळ उभे राहिलेला असताना या बाळापुरमध्ये किती राडा होणार आहे याचा तुम्ही विचार करा. भारताचे उत्पन्न, भारताच्या अर्थव्यवस्थेची या मोदी सरकारने वाट लावली आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. असा टोला वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सरकारला लगावला. जेव्हा आर्थिक मंदी आली तेव्हा भाजपने सगळीकडे ठीक सुरू आहे असे म्हणत ते टाळण्याचा प्रयत्न केला. पण, लोकांनी त्यांना डोळे उघडून बघा काय ठीक सुरू आहे ते, असे प्रश्न विचारले. विशेष म्हणजे, सुजात आंबेडकर यांची ही पहिलीच राजकीय सभा आहे. तसेच ते पहिल्यांदाच जाहीरपणे भाषण देत असल्याचा उल्लेख वंचितचे बाळापुर येथील उमेदवार प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला.
बाळापूर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांच्या प्रचार सभेमध्ये सुजात बोलत होते. पुढे ते म्हणाले, या सरकारने उद्योगधंदे बंद पाडले आणि तुम्ही म्हणता की नागरिकांनी गाडी घेतली पाहिजे. म्हणजे आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था चांगली राहील. 'अरे बाबा ये क्या चल रहा है' त्यापुढे जाऊन अर्थमंत्री म्हणाल्या, जर या देशाची आर्थिक मंदी घालवायची असेल तर तरुणांनी गाड्या घेतल्या पाहिजेत. मी त्यांना म्हटलं, ताई आमच्या महाराष्ट्रात येऊन बघा, डोळे उघडून बघा. रिक्षाचे भाडे भरता येत नाही, नवीन गाड्या कुठून विकत घ्यायच्या आम्ही. त्यांचे हे सर्व विश्लेषन एकूण मला एक प्रश्न पडतो की, या अर्थमंत्री नसून अनर्थमंत्री आहेत, असा टोला त्यांनी मारला.
हेही वाचा - 'आरएसएसला मुख्यलयावर तिरंगा फडकवण्यासाठी 60 वर्षे लागली'
मुख्यमंत्री आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढली होती. या यात्रेत त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा एकही प्रश्न उच्चारला नाही. तुमच्या शिक्षण, इकडची परिस्थिती, आर्थिक मंदी, पाण्याचा प्रश्न, रस्ते, शेतकऱ्यांबद्दल ते बोलले नाहीत तर, ते कलम 370 बद्दलच बोलले. मला एक सांगा ही सरकार महाराष्ट्राची निवडणूक किती दिवस काश्मीरच्या मुद्द्यावर लढवणार आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत, एक पाऊस पडला तर त्याचे तळे साचेल आणि त्या तळ्यात कमळ उगवेल, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
हेही वाचा - असदुद्दीन ओवैसींच्या सभेला 5 तास उशीर; 6 मिनिटांत उरकले भाषण
आम्ही पाकिस्तानला हरवला, पाकिस्तानला मागे टाकले, असा प्रचार सरकारकडून केला जात आहे. अहो पाकिस्तानचे सोडा, आपल्या बाजूला असलेल्या बांग्लादेशची जीडीपी आपल्यापेक्षा जास्त आहे, असे सांगून पाकिस्तानचा तुम्ही द्वेष केला, त्याच पाकिस्तानला तुम्ही शिव्या दिल्या असेही ते म्हणाले. ज्यावेळी येथील शेतकऱ्यांचा कांद्याचा भाव वाढत असेल तेव्हा बरोबर तुम्हाला पाकिस्तानचा कांदा आठवतो. म्हणजे या सरकारचा दुटप्पीपणा समजून घ्या, हे सरकार पाकिस्तानला शिव्या देते. परंतु, ही सरकार शेतकऱ्यांना पाकिस्तानपेक्षाही मोठा शत्रू समजू समजू लागली आहे. असे का? कोणाला ठाऊक नाही, असा प्रश्न उपस्थित करत वंचितचे युवा नेते तथा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी सरकारच्या 2014 च्या निवडणुकीमधील 5 वर्षांच्या आश्वासनांची पुणेरी भाषेत चांगलीच टर उडवली.
हेही वाचा - वंचितांचे संचित आम्ही बदलणार - केंद्रीय मंत्री अरविंद सावंत