अकोला - महामार्गामध्ये जमीन गेल्यानंतर 2012 पासून कमी मोबदला मिळल्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी दालनासमोरच 6 शेतकऱ्यांनी विष पिल्याची घटना घडली. या शेतकऱ्यांना उपचारासाठी तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या 1 दिवस अगोदर ही घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेख साजिद शेख इक्बाल, महम्मद अफजल गुलाम नबी, अर्चना भारत टकले, मुरलीधर प्रल्हाद राऊत आणि मदन कन्हैयालाल हिवरकर यांची अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या दालनात मोबदल्यासंदर्भात सुनावणी सुरू होती. सुनावणीनंतर अप्पर जिल्हाधिकारी लोणकर यांनी तुम्हाला दिलेला मोबदला योग्य आहे. तुम्हाला काही करायचे असेल ते करा, असे म्हटले. त्यानंतर या 6 शेतकऱ्यानी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
या 6 शेतकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याठिकाणी भारिप बहुजन महासंघाचे आमदार बळीराम सिरस्कार, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, उपविभागीय अधिकारी निलेश अपार यांनी रुग्णालयातील शेतकरऱ्यांची भेट घेतली. तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनीही रुग्णांची भेट घेतली.
दरम्यान, महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये भूसंपादन झालेल्या काही शेतकऱ्यांना 2012 पासून कमी मोबदला मिळत होता. त्यामुळे काही शेतकऱ्यांना जास्त आणि काही जणांना कमी मोबदला का ? या प्रश्नासाठी हे शेतकरी शासनदरबारी न्याय मागत होते.