अकोला - सहाव्या वेतन आयोगातील फरकाच्या थकीत रकमेमधील 20 हजार रुपये आणि वसुली झाल्यास दिवाळीपूर्वी एक वेतन असे आश्वासन मनपा कडून देण्यात आले आहे. या आश्वासनावर विश्वास ठेवून मनपा कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त आणि कर्मचारी संघटना यांच्यात आज वाटाघाटी करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या संपाची हाक मागे घेतली.
गेल्या 14 वर्षांपासून महापालिका कर्मचाऱ्यांचे सहावा वेतन आयोगातील फरक आणि रजा रोखीकरणाची रक्कम थकबाकी आहे. त्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी माजी महापौर विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसणे, उपमहापौर राजेंद्र गिरी, स्थायी समिती सभापती सतीश ढगे, संघटनेचे नेते पी. बी. भातकुले, अनुप खरारे यांच्यासोबत चर्चा झाली होती. यावेळी चर्चेदरम्यान सहाव्या वेतन आयोगाचे प्रत्येकी 20 हजार रुपये, कर विभागाची वसुली होताच टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, कर्मचारी संघर्ष समितीला मागण्या मान्य नव्हत्या. त्यामुळे आंदोलनाच्या मुद्द्यावर ठाम राहत बुधवारपासून काम बंद आंदोलनाचा निर्णय संघटनेने घेतला होता. परंतु, संघर्ष समितीच्या आंदोलनाचा पाठिंबा काढण्याची निर्णय धनंजय मिश्रा, विठ्ठल देवकते यांनी घेतला.
करवसुली झाल्यास मिळणार वेतन-
या संदर्भात मनपा आयुक्त संजय कापडणीस आणि मनपा कर्मचारी संघटनेच्या नेत्यांमध्ये आज परत बैठकी झाल्या. त्या बैठकीमध्ये सहाव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम वीस हजार रुपये आणि घर कर वसूल झाल्यास एक महिना वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर सर्व कर्मचारी संघटना संमत झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
कर्मचारी करणार कर वसुली
महापालिकेची कर वसुली बाकी आहे. मनपाचा मुख्य उत्पन्न स्रोत बंद आहे. त्यामुळे ही वसुली कर्मचाऱ्यांनी करून त्यांनी वेतनाची रक्कम जमा करण्याचे आदेश मनपा आयुक्त यांनी दिले आहे. एन दिवाळीत कर वसुली होईल का हा प्रश्न निर्माण झाला आहे.