अकोला - ग्रामपंचायतीला लाभलेल्या आरो प्लांट आणि पाणीटंचाईच्या मुद्द्यावर जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा आज गाजली. जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभा शेळके व सदस्य हिम्मत घाटोळ यांनी यासंदर्भात पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यास चांगलेच धारेवर धरले.
जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतीमध्ये ४८ जलशुद्धीकरण सयंत्र लावण्यात आले आहे. किती सयंत्र सुरू अथवा बंद आहेत, याबाबत सदस्या शोभा शेळके व वाडेगावचे सदस्य हिम्मत घाटोळ यांनी विचारणा केली. मात्र, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता अशोक ढवळे यावर व्यवस्थित माहिती देऊ शकले नाहीत. त्यामुळे या दोन्ही सदस्यांनी त्यांना चांगलाच जाब विचारला. त्यासोबतच असलेले नादुरुस्त मोटरपंप तत्काळ दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठीही त्यांना जाब विचारला.
जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनीही त्यांना खडेबोल सुनावणीत दोन्ही सदस्यांना तत्काळ माहिती देण्याचे आदेश दिले. जिल्हा परिषदेचे सदस्य रामदास लांडे यांनी पारस येथील दूषित पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद यांनी या पाण्याचे नमुने घेतले असून त्याचा अहवाल आल्यानंतर लगेच तिथे उपाययोजना करू, अशा सूचना देत तात्पुरती दुरुस्ती करण्याचे आश्वासनही दिले.
भूखंड नदीवरील कोल्हापूरी बंधाऱ्याला गेट न लावल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी सदस्य लांडे यांनी केली. त्याबाबत सीईओ प्रसाद यांनी त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ प्रसाद यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले. तसेच पाणी टंचाईत खासगी विहीर अधिग्रहित करण्यासाठी गावातील नागरिकांना बाध्य करा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी उपस्थित सदस्यांनी केले. तसेच ज्यांनी शासकीय योजनेतून विहिरी घेतल्या त्यांच्या विहिरी पाणी वाटपासाठी अधिग्रहित करण्याचे आदेश ही आयुष्य प्रसाद यांनी केले आहे.