अकोला - महानगरातील भाजपच्या नगरसेवकांच्या ताब्यात असलेल्या प्रभाग क्रमांक सहामध्ये विकासकामांच्या नावाने खड्डे खोदण्यात आले आहे. परंतु, खड्डे खोदल्यानंतर तेथे कोणतीच कामे करण्यात न आल्याने हे खड्डे उघडे पडलेले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आधीच परिसरातील नागरिकांची कंबर मोडलेली असतानाच नव्या खड्ड्यामुळे त्यांना आणखी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी या खड्ड्यांसमोर 'यमलोकद्वारा'चे फलक लावून भाजपच्या नगरसेवकांचा निषेध व्यक्त केला.
महानगरात सुरू असलेल्या विकास कामांची यादी पाहता कामे पूर्ण झालेली नाहीत. महानगरात बनविण्यात आलेल्या कोट्यवधी सिमेंट रस्त्यांचे दीड वर्षात बेहाल झाले आहेत. तर प्रभाग क्रमांक सहामध्ये असलेल्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. मोठमोठे खड्डे तयार करून त्यानंतर त्या ठिकाणी पुढील कुठल्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. यामुळे येथील नागरिकांना अडचणी होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते पवन महल्ले यांनी या खड्ड्याच्या समोर 'यमलोकद्वार' असे फलक लावत भाजपच्या चारही नगरसेवकांची खिल्ली उडवली आहे. परंतु या फलकांवर दुर्लक्ष करीत भाजपच्या नगरसेवकांनी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा प्रकार तर सोडाच त्या परिसरात जाण्याचेही टाळले आहे.
हेही वाचा - अकोल्यात दमदार पावसाची हजेरी
परिणामी, भाजप नगरसेवकांच्या या उद्दामपणामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला या प्रभागातून मते मिळतील का?, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
हेही वाचा - रस्त्यावरील खड्ड्यात कमळाची फुले लावत 'वंचित'चे आंदोलन