अकोला - कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका बालिकेचा गुरुवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ही बालिका कोरोना पॉझिटिव्ह असली तरी तिच्या ह्रदयात छिद्र असल्याने तिचा मृत्यू झाल्याचे महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - 'कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकार उचलणार'
जिल्ह्यात लहान मुलांसाठी कोरोना रुग्णालय
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना तिसरी लाट आल्यास यात लहान मुलांना सर्वात जास्त धोका असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी प्रशासन प्रत्येक जिल्ह्यात लहान मुलांसाठी कोरोना रुग्णालय उभारत आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका सहा महिन्यांचा बालिकेचा मृत्यू झाला आहे.
उपचारांदरम्यान झाला मृत्यू
पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या गावात राहणाऱ्या सहा महिन्यांच्या बालिकेला गुरुवारी रात्री उशिरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना तीन तासांतच म्हणजेच रात्री 1 वाजता त्या बालिकेचा मृत्यू झाला.
बालिकेच्या ह्रदयाला होते छिद्र
या बालिकेच्या ह्रदयाला छिद्र असल्याने तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. या बालिकेचा रॅपिड अँटिजेन चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता व त्याच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी सांगितले आहे. गुरुवारी पहाटे या बालिकेचा मृतदेह पालकांकडे देण्यात आल्याची माहिती आहे. आता त्यांचीही कोरोना तपासणी करण्यात येणार आहे.