अकोला - मॅडम घर करावरील शास्ती रद्द करा, मी आपल्या पाया पडतो, अशी विनवणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज मनपाच्या ऑनलाइन सभेच्या ठिकाणी येऊन प्रभारी मनपा आयुक्त यांच्याकडे केली. परंतु, मनपा आयुक्त या त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याने त्यांनी नगरसेवकांचे म्हणणे ऐकले नाही. शेवटी शिवसेनेच्या नगरसेवकांनी कक्षात गोंधळ करून ऑनलाइन सभेचे कनेक्शन बंद केले. हा प्रकार पाहून महापौर अर्चना मसने यांनी शिवसेनेच्या आठ नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकास एका सभेसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले.
कोरोना काळ, अतिवृष्टीमुळे शहरातील गरीब नागरिकांकडे घर फाळा भरण्यासाठी पैसा नाही. त्यात मनपा घर करावरील शास्ती लावत आहे. ती शास्ती लावण्यात येऊ नये, अशी मागणी घेऊन शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा व इतर नगरसेवक हे महापौर यांच्या कक्षात आले. ऑनलाइन सभा सुरू असतानाही नगरसेवकांनी सभा सुरू करण्यास मनाई केली. तसेच शास्ती रद्द करण्याची मागणी मनपा आयुक्त निमा अरोरा यांच्याकडे केली. यावर प्रभारी आयुक्त अरोरा यांनी लेखापाल यांच्याशी बोलून आणि नियम पाहून सांगितले की, मागील सभेत आपण हा विषय घेतला होता. त्यावर मी माझ्या अधिकाराचा वापर करून शास्ती जुलै महिन्यासाठी रद्द केली होती. परंतु, ती आता रद्द करण्याची परवानगी मी देत नाही, असे त्यांनी सांगितले. यावर सेनेचे गटनेता मिश्रा हे फारच गरम झाले. त्यांनी सभेत याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच इतरही पक्षाच्या नगरसेवकांनी यावर नाराजी व्यक्त करीत मनपा आयुक्त यांनी हा निर्णय मागे घ्यावा आणि शास्ती तीन महिन्यासाठी रद्द करावी, अशी मागणी केली. मात्र, मनपा आयुक्त यांनी काहीच ऐकले नाही.
हे ही वाचा -क्रेनला लटकवली हंडी, मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
यावर शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा व उपस्थित सेनेचे नगरसेवक गजानन चव्हाण, मंगेश काळे, मंजुषा शेळके, सपना नवले यांनी जोरदार विरोध केला. यावेळी गटनेता मिश्रा यांनी ऑनलाइन सभा सुरू असलेले सर्व साहित्य बंद केले. यामुळे सभा होऊ शकली नाही. शेवटी महापौर आणि आयुक्त यांनी कक्षात उपस्थित पोलिसांना या नगरसेवकांना बाहेर काढण्यास सांगितले. त्यावर नगरसेवकांनी याला विरोध केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रहीम पेंटर यांनी याला विरोध दर्शविला. शेवटी, महापौर अर्चना मसने यांनी सर्व नगरसेवकांना एका सभेसाठी निलंबित करण्यात येईल, असा इशारा दिला. तेव्हा, सेनेच्या नगरसेवकांनी फक्त इशारा नका देवू निलंबित करा. त्यावर महापौर अर्चना मसने यांनी सेनेच्या आठ आणि राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाला निलंबित केले.
हे ही वाचा - ईडीचा कारवाई.. भाजपचे हल्ले, शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक, राज्यातील सद्य:स्थितीवर होणार चर्चा
पोलिसांनी नगरसेवकांना बाहेर काढण्याचा केला प्रयत्न -
यावेळी मात्र सभेत उपस्थित असलेल्या पोलिसांनी नगरसेवकांना सभेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्याला विरोध केला. शेवटी, महापौर आणि आयुक्त यांनी सेनेच्या नगरसेवकांना शांत राहण्याची सूचना केली. मात्र, ते ऐकत नव्हते.