अकोला - गावगुंडांनी गावात दहशत निर्माण केली असून घरात जाऊन मारहाण करत असल्याचा आरोप शिर्ला अंधारे या गावातील ग्रामस्थांनी केला आहे. गावातील शिवा निलखन या गावगुंडाच्या दहशतीने भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी दुपारी पोलीस अधिक्षक कार्यालयावर धडक दिली.
हेही वाचा - बहीण रागावली म्हणून 14 वर्षीय मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
दरम्यान, पातूर पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या शीला ग्रामस्थांना पातुरचे ठाणेदार न्याय देत नसल्यामुळे त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात कायद्याचे राज्य की गुंडांचे राज्य असा प्रश्न या घटनेवरून निर्माण झाला असल्याचे गावकरी म्हणत होते. या घटनेने पोलिसांना आव्हान मिळाले आहे. पोलीस अधीक्षक अमोघ गावकर कशाप्रकारे पाहतात, यावर ग्रामस्थांची भिस्त आहे.
शस्त्र घेऊन गावात दहशत निर्माण करणे, महिलांना अश्लील बोलणे आदी गोष्टींमुळे शिर्ला गावात दहशतीचे वातावरण आहे. शिवा निलखन आणि त्याच्या मित्रांच्या दहशतीसंदर्भात पातुर पोलिसांमध्ये गावकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, पोलिसांच्या आशीर्वादामुळे शिवाची गावातील दहशत वाढत गेली. असा आरोप गावकऱ्यांनी यावेळी केला.
याआधी शिवा निलखनवर गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी त्याच्यावर तडीपारीची कारवाई केली. पातुर पोलीस ऐकत नसल्यामुळे अखेर गावकऱ्यांनी अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे कैफियत मांडण्यासाठी थेट अकोला गाठले. लहानांपासून तर वृद्धापर्यंत ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले होते. शिवा निलखन आणि त्याच्या मित्रांचा योग्य तो बंदोबस्त पोलिसांनी लावून ग्रामस्थांची या दहशतीतून सुटका करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिरला तंटामुक्त अध्यक्ष गणेश गवई यांच्या नेतृत्वात हे ग्रामस्थ पोलिस अधीक्षकांकडे आले होते.
हेही वाचा - मुंबईतील लोहार चाळीतील इमारत कोसळली; व्हिडिओ व्हायरल