अकोला - भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री व प्रसिद्ध वकील अरुण जेटली यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वसनाचा त्रास आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. जेटली यांच्या निधनाने देशाचे सर्वांत मोठे नुकसान झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
अरुण जेटली यांच्या निधनामुळे पक्षाचे नव्हे तर देशाचे मोठे नुकसान झाले आहे. आणीबाणीच्या काळात त्यांचे नेतृत्व उदयास आले. पक्षासाठी त्यांनी संघटन मजबूत केले. कुशल संघटक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने एक पक्षाचा खंदा कार्यकर्ता हरपला असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात जेटली यांनी मंत्रिपद भूषविले होते. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही कार्यकाळात त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली होती. त्यांनी मोठमोठी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. जीएसटी सारखा विषय त्यांच्या अभ्यासूपणामुळे सरकारने चांगल्याप्रकारे हाताळला.
प्रकृती अस्वस्थेमुळे त्यांनी निवडणूक तथा मंत्रीपद न घेण्याचा निर्णय घेतला होता. इतक्या मोठ्या मनाच्या मानसासोबत काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य समजतो, असे संजय धोत्रे म्हणाले.