अकोला - अमरावतीमधील मुली व महिला दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. शहरात भरदिवसा एका मुलीचा गळा चिरून खून करण्यात येतो. अशा प्रकारच्या 4 घटना घडतात. तरीही सरकारने या घटनेकडे गांभीर्याने बघितले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री हे धृतराष्ट्र झालेत का? असा सवाल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सनगर यांनी उपस्थित केला.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या संपर्क अभियान संदर्भात सनगर विदर्भ दौऱ्यावर आहेत.
पुढे बोलताना सनगर म्हणाल्या, अमरावतीमध्ये अत्याचार झालेला सरकारला दिसत नाही का? विशेष म्हणजे पोलीस विभाग या घटनेबाबत मूग गिळून बसल्याचा आरोप त्यांनी केला. अकोल्यातील दौऱ्यात त्यांनी अमरावती येथील मोर्शी तालुक्यामधील एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी एकही मुलगी बोलण्यासाठी समोर आली नाही. काही मुलींनी खासगीत अमरावतीमध्ये घडलेल्या घटनांनंतर अमरावतीतील महिला व मुलीच्या स्थितीची माहिती दिली असल्याचे सनगर यांनी सांगितले.
सही येत नाही आणि मेट्रो ट्रेन आणतात. एखादी मेट्रो कमी आली तरी चालेल, पण महिला व मुलींची सुरक्षितता यावर भर देणे सरकारची जबाबदारी आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तरी याची दखल घेतली का? असा सवालही सनगर यांनी केला.
या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, आशा मिरगे, राजकुमार मूलचंदानी, श्रीकांत पिसे यांच्यासह आदी उपस्थित होते.