अकोला - खदान पोलीस ठाण्याअंतर्गत राहणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्याचे घर फोडून, चोरांनी पोलिसांनाच आवाहन दिले होते. चोरी करणाऱ्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज मुसक्या आवळल्या. हे दोन्ही चोर अल्पवयीन आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त केला आहे.
खदान पोलिस स्टेशनअंतर्गत राहणाऱ्या महिला पोलीस अधिकारी भगत यांच्या घरातून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्या नंतर त्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 75 ग्रॅम सोने आणि 20 ग्रॅम चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल सह आदी मुद्देमाल जप्त केला. या दोन्ही अल्पवयीन मुलांना खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास खदान पोलीस करत आहे.