अकोला - जिल्ह्यातील कोरोना संसर्गात वाढ होत आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यशासनाचे खास दूत म्हणून मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार दीपक म्हैसेकर यांनी आज जिल्ह्याला भेट दिली. त्यांनी यावेळी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिचा आढावा घेतला. तसेच कोरोनाला अटकाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची देखील माहिती घेतली.
म्हैसेकरांकडून कोरोना परिस्थितीचा आढावा
मुख्यमंत्र्यांचे कोविड विषयक बाबींचे सल्लागार दीपक म्हैसेकर यांनी आज अकोला येथे भेट दिली. त्यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा तालुकानिहाय आढावा घेतला. ते यावेळी बोलताना म्हणाले की, पुढील महिनाभराचा काळ हा कसोटीचा आहे. त्यामुळे सर्व यंत्रणेने अतिशय सतर्क राहणे आवश्यक आहे. ज्या भागात अधिक रुग्ण आढळून येतील तो भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करा. दिवसाला किमान कोरोनाच्या दोन हजार 400 चाचण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. ज्या लोकांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहे त्यांना ओळखता यावे म्हणून हातावर शिक्के मारा. त्यांच्या प्रकृतीचे दररोज निरीक्षण करावे, व त्यांना औषधोपचाराचा पुरवठा नियमीत करावा, अशा सूचना त्यांंनी दिल्या. दरम्यान यावेळी त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाचा देखील आढावा घेतला.