अकोला - खतांच्या दरामध्ये झालेली भरमसाठ वाढ ही शेतकऱ्यांना न परवडणारी आहे. मागील वर्षीच्या दरात आणि आताच्या दरात जवळपास 700 रुपयांपेक्षा जास्त दरवाढ झाली आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून सबसिडी न देता थेट खताची दरवाढ करून शेतकऱ्यांकडून सरकार वसुली करीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी केला आहे.
शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या मशिन्स या डिझेलवर चालतात. सध्या डिझेल आणि पेट्रोल दर गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे शेती उपयोगासाठी इंधन दरवाढ शेतकऱ्यांना न परवडणारी झाली आहे. त्यामुळे डिझेल, पेट्रोल, खत यांचे दर कमी करावे, अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, वंचित जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, पूर्व महानगर अध्यक्ष शंकरराव इंगळे, गजानन गवई, गजानन दांडगे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे, पुरषोत्तम अहिर, सुमेध अंभोरे, सुगत डोंगरे, मनोहर बनसोड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.