अकोला - पुणे येथील एल्गार परिषदमध्ये शर्जील उस्मानी यांनी हिंदू बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्या विरोधात रामनवमी शोभायात्रा समिती आणि भारतीय जनता पक्षातर्फे रोष व्यक्त करत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे एक निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये हे निवेदन देण्यात आले आहे.
पुणे येथे पार पडलेल्या एल्गार परिषदमध्ये शर्जील उस्मानी यांनी भाषण केले होते. त्यामध्ये त्यांनी हिंदू समाजाबद्दल अपशब्द काढून हिंदू समाजाचा अपमान केला होता. हे कृत्य हिंदुस्थानमध्ये राहून हिंदू विरुद्ध करण्यात आलेले षड्यंत्र आहे. शर्जील यांच्या वक्तव्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याच पार्श्वभूमीवर शर्जील उस्मानी यांच्याविरोधात रामनवमी शोभायात्रा समितीचे वतीने शर्जील यांच्यावर कारवाई करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यासोबतच नगरसेवक नगरसेविका यांचाही यावेळी सहभाग होता.
भारतात राहून हिंदु बद्दल बोलणे अयोग्य - आमदार शर्मा
भारतात राहून हिंदू धर्माबद्दल अपशब्द बोलणे, हे अयोग्य आहे. हेच वाक्य जर पाकिस्तानमध्ये म्हटले गेले असते तर त्याचे परिणाम सर्वांना माहीत आहेत. त्यामुळे हिंदूंचा अंत पाहू नये, असा इशारा भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी दिला आहे.