अकोला - शहरात मंगळवारी सायंकाळपासून झालेल्या जोरदार पावसाने न्यू तापडिया नगर येथील क्रांती चौक परिसरातील नाल्याला मोठा पूर आला. नाल्याचा काही भाग वाहून गेला. दुसऱ्या बाजूस असलेल्या नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरले. त्यामुळे, नागरिक त्यामध्ये फसले. त्यांना सकाळी नगरसेवक व माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या मदतीने अग्निशामक दलाच्या जवानांनी दोर बांधून काढले. अडकलेले नागरिक हे रात्रभर त्याच ठिकाणी राहिले.
हेही वाचा - अकोल्यात जोरदार पाऊस; शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी गडबड
नाल्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की आसपासच्या काही प्लॉटमध्ये तुडुंब पाणी भरले. नाल्यांमध्ये जलकुंभी असल्यामुळे ते पाणी जायला वेळ लागला. नाल्याला मोठा पूर आला. यामुळे काही नागरिक रात्री त्या ठिकाणी फसले. त्यांना सकाळी अग्निशामक दलाच्या जवानांनी व स्वतः नगरसेवक विजय अग्रवाल, सागर शेगोकार यांच्या प्रयत्नाने बाहेर काढले.
दोर बांधून काढले बाहेर
नाल्याच्या पाण्यामुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित दुसऱ्या बाजूला आणण्यासाठी दोर बांधण्यात आला. यामध्ये जवळपास 30 ते 40 नागरिक फसले असल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले.
66.4 मि.मी पावसाची नोंद
अकोल्यात मंगळवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडला. अनेक भागांत पावसाचे पाणी साचले. नाल्यातील पाणी काहींच्या घरात गेले. रात्रभर 66.4 मि.मी सेल्सिअस एवढी नोंद हवामान वेधशाळेने घेतली आहे.
महापालिकेच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे महापालिकेकडून करण्यात येते. मात्र, या वर्षी नालेसफाई झाली नसल्याने अनेक ठिकाणी नाल्यातील पाणी प्रचंड पावसामुळे मोकळ्या जागेत साचले आहे. काही ठिकाणी तर रस्त्यावर हे घाण पाणी आले आहे. यामुळे महापालिकेचा नालेसफाईचा दावा फोल ठरत आहे. महापालिकेकडून नालेसफाई न झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
हेही वाचा - अकोल्यात शिवसेनेकडून इंधन दरवाढीचा विरोध; पेट्रोल पंपावर नागरिकांना वाटले चॉकलेट