अकोला - शहरात भरधाव आणि फटाके फोडणाऱ्या बुलेटविरोधात शहर वाहतूक शाखेने गेल्या दोन महिन्यांपासून कारवाई केली आहे. त्यामध्ये 50 बुलेटचे फटाके फोडणारे सायलेन्सर बदलवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. यासोबतच फॅन्सी नंबर बनवून देणाऱ्याची बैठक घेऊन त्यांना तंबी देऊन फॅन्सी नंबर प्लेट बनवल्यास कारवाईचा इशारा देत त्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे.
दंडात्मक कारवाई करूनच बुलेट सोडण्यात आल्या-
शहर वाहतूक शाखेकडून मागील दोन महिन्यापासून बुलेट दुचाकीचे मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून फटाके फोडणारे व मोठा आवाज करणारे सायलेन्सर लावून भरधाव बुलेट चालविणाऱ्या 'बुलेटराजा'विरुद्ध कारवाईचा बडगा शहर वाहतूक शाखेने सुरू केला आहे. या मोहिमेअंतर्गत 50 बुलेट वाहतूक कार्यालयात लावून डुप्लिकेट सायलेन्सर जे इंदोर, पंजाबी, डबल पंजाबी अश्या नावाने ओळखल्या जातात, असे सायलेन्सर काढून मूळ सायलेन्सर लावून दंडात्मक कारवाई करूनच बुलेट सोडण्यात आल्या.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या नेतृत्वाखाली शहर वाहतूक शाखेची कारवाई-
या मोहिमेच्या धसक्याने बऱ्याच बुलेट राजांनी आपल्या दुचाकींचे डुप्लिकेट सायलेन्सर बदलून ओरिजिनल सायलेन्सर लावले. त्याचप्रमाणे शहरातील फॅन्सी नंबर प्लेट बनविणारे, डुप्लिकेट सायलेन्सर लावून देणाऱ्या कारागिरांची वाहतूक कार्यालयात बैठक घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये फॅन्सी नंबर प्लेट व डुप्लिकेट सायलेन्सर बदलून देता कामा नये, अशी तंबी देऊन त्यांना लेखी नोटीस सुद्धा देण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या नेतृत्वाखाली शहर वाहतूक शाखेने केली आहे.
मेकॅनिकल आणि नंबर प्लेट बनविणाऱ्यांची बैठक-
बुलेटचे सायलेन्सर काढून त्यावर फटाके फोडणारे आणि कर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावणारे आणि नंबर प्लेट बनविणाऱ्यांची बैठक शहर वाहतूक शाखेने त्यांच्या कार्यालयात आज घेतली. त्यांना असे बोगस कामे करण्यापासून मज्जाव करीत त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आली आहे.
हेही वाचा- नाना पटोलेंची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड