अकोला - अमृत योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या २ नगरसेवकांना फरफटत सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले. दोन्ही नगरसेवकांना ३ सभांसाठी निलंबितही करण्यात आले. हा प्रकार अकोला महापालिकेत झाला.
शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा व नगरसेवक गजानन चौहान यांनी महापौर विजय अग्रवाल यांना अमृत योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याबद्दल विचारले. परंतु, महापौर अग्रवाल यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यांना ३ सभांसाठी निलंबित केले. यामुळे सेनेच्या नगरसेवकांनी महापौर यांच्या समोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे सभागृहाचे काम बाधित झाले. शेवटी पोलिसांना बोलावून या दोन्ही नगरसेवकांना शेवटी आज फरपटत बाहेर काढले. याला काँग्रेसचे विरोधी पक्ष नेता साजिद खान यांनी विरोध दर्शविला.
महापौर अग्रवाल यांनी शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांना बोलाविले. त्यांनी या दोन्ही नगरसेवकांना अक्षरशः उचलून व फरपटत नेऊन बाहेर काढले. यानंतर या दोघांना सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. त्यानंतर सभेला परत सुरवात झाली.
हापालिकेची सर्वसाधारण सभा सभागृहात सुरू झाली. सभेच्या सुरवातीला पुलवामा येथील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांनतर सभेत महापौर विजय अग्रवाल यांच्या समोर शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा व नगरसेवक गजानन चौहान यांनी अमृत योजनेत १४ कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करीत प्रश्न विचारला. या प्रश्नावर सभागृहात चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे महापौर अग्रवाल यांनी सभागृहाची शिस्त बिघडीत असल्याने या दोन्ही नगरसेवकांना ३ सभेसाठी निलंबित केले. तसेच दोन्ही नगरसेवकांना बाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, याला विरोधी पक्षनेता साजिद खान यांनी ही विरोध दर्शवित महापौर यांच्याशी चर्चा केली.या दोन्ही नगरसेवकांवर पोलीस काय कारवाई करतील याबाबत शहर पोलिस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांना विचारणा केली. त्यांनी अद्याप कुठलीही कारवाई करणार नसून महापालिकेकडून पुढील पत्र आल्यास कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.