वाशिम - अकोला नाका ते पाटणी चौक येथील खड्डेमय रस्त्याच्या निषेधार्थ शेतकरी संघर्ष संघटनेच्यावतीने खड्ड्यात वृक्ष लागवड करून आंदोलन करण्यात आले.
शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. रस्त्यांची चाळण झाली आहे. सर्व जनतेच्या हितार्थ शेतकरी संघर्ष संघटनेने 11 जुलै रोजी नगर परिषद अध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन यासंदर्भात मुख्य अभियंता बांधकाम विभाग यांच्याशी चर्चा केली होती आणि तीन दिवसात खड्डे बुजवून नागरिकांना रहदारीसाठी मार्ग सुकर करावे, अशी मागणी करण्यात आली होती.
परंतु, आजपर्यंत दहा दिवस होऊन सुध्दा खड्डे बुजवले गेले नाहीत. म्हणून नगर परिषद शासन व प्रशासनाच्या बेफिकीर व निष्काळजी कारभाराच्या निषेधार्थ अकोला नाका ते पाटणी चौक या रस्त्यावरील खड्ड्यात वृक्ष लागवड व डफडे बजाव आंदोलन शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीने करण्यात आले.