अकोला -कापसाचे प्रतिबंधित जनुकीय सुधारित (एचटीबीटी) बियाणे शेतकऱ्यांना बाजारपेठेत उपलब्ध व्हावे, यासाठी किसान तंत्रज्ञान स्वतंत्र आंदोलनाने सत्याग्रह केला. बुधवारी मध्यरात्रीपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत अडगाव बु. येथील शेतकरी लक्ष्मीकांत कौठकर यांच्या शेतात अधिकृत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे वाटप करण्यात आले. या वाटपात 357 शेतकऱ्यांनी सहभागी झाले.
शेतकऱ्यांनी मागील वर्षी 36 टक्के पेरणी शासनाने प्रतिबंध लावलेल्या एचटीबीटी कपाशीच्या वाणाची केली होती. तणांचा निर्मूलनाचा खर्च जास्त असल्याने एचटीबीटीकडे शेतकऱ्यांचा कल जात आहे. एकीकडे कृषी विभाग म्हणतोय उत्पादन खर्च कमी करा, दुसरीकडे उत्पादन खर्च कमी करणाऱ्या बियाणाला विरोध करते. हे समजण्यापलीकडील धोरण आहे. यावरील बंदी उठविल्यास शेतकऱ्यांना सरळ व्यवहारातून अधिकृत बियाणे उपलब्ध होईल. यावर सरकारने लवकरच आपला निर्णय जाहीर करावा, अशी मागणी किसान तंत्रज्ञान स्वतंत्र आंदोलनाने केली आहे.
सर्व कृषी केंद्रामार्फत एचटीबीटी बियाणे सरळ व्यवहारातून शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे,असे कार्यक्रमाचे निमंत्रक लक्ष्मीकांत कौठकर यांनी म्हटले आहे. यावेळी ललित बाहाळे व सतीश देशमुख यांच्या हस्ते नोंदणीकृत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले.
कृषी विभागाचे काम कृषी क्षेत्रात संशोधन करून त्याला प्रसारित करून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचवणे आहे. परंतु, ते काम सोडून ते शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहचू नये, या दिशेने काम करीत आहे. शेतकऱ्यांना जनुकीय तंत्रज्ञान शिवाय पर्याय नाही, असे शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते किसान तंत्रज्ञान स्वतंत्र आंदोलनाचे नेते ललित बाहाळे यांनी म्हटले आहे.
शेतीवर जनसांख्यिकी भार वाढत आहे. कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पादन मिळणे आवश्यक आहे, असे मत शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा प्रमुख सतीश देशमुख यांनी व्यक्त केले. शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख माहीत व तंत्रज्ञान आघाडी लक्ष्मीकांत कौठकर यांनी मागील वर्षीपासून जनुकीय सुधारित बियाण्यांना परवानगी मिळावी, या करिता आम्ही आंदोलन करत आहोत, असे सांगितले.
मागील वर्षी अकोली जहांगीर येथे 10 जून 2019 रोजी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ललित बाहाळे यांच्या शेतातून सुरू एचटीबीटी बियाण्याचे वाटप सुरु करण्यात आले होते. या आंदोलनात प्रतिबंधित एचटीबीटी कपाशीच्या वाणाची लागवड करण्यात आली होती.