अकोला - जिल्हा अजून रेड झोनमध्ये नसला, तरी धोका कायम आहे. शहरातील अनावश्यक गर्दी टळावी म्हणून पोलीस प्रशासन दिवसरात्र प्रयत्न करीत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई केली. यात 525 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून 150 वाहने वाहतूक कार्यलयात जप्त केली.
जिल्ह्यात तीन कोरोना रुग्ण आहेत. ही संख्या वाढू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. तरीही नागरिक गांभीर्य दाखवत नाहीत. दुपारी 12 वाजेपर्यंत नागरिक वेगवेगळ्या कारणाने बाहेर पडत आहेत. तसेच अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. अशा वाहन चालकांवर शहर वाहतूक शाखेने कारवाई केली. जप्त वाहने लॉकडॉऊन संपेपर्यंत सोडण्यात येणार नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी दिली. नागरिकांनी विनाकारण आपली वाहने रस्त्यावर आणू नये व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.