अकोला - मुर्तीजापूर तालुक्यातील एका गावातील पोलीस पाटलाने शेजारच्या गावातील महिलेचा विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घृणास्पद घटना पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून समोर आली आहे. मंगरूळ कांबे येथील पोलीस पाटील दिनेश वाकोडे याने महिलेचा विनयभंग व बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केल्यास पीडित महिलेस जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच संशयित आरोपी फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शेलू बोंडे येथील एका महिलेने १३ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पोलीस पाटील दिनेश वाकोडे याने २० जुलैच्या रात्री दीड वाजता तिचे दार ठोठावले. घराबाहेर येताच हात धरून ओढत नेऊन विनयभंग केला. त्यापूर्वी १२ जुलैच्या रात्री साडेअकराच्या दरम्यान लघूशंकेसाठी घराबाहेर आले असताना आरोपीने बळजबरी करुन अतिप्रसंग केला व घटनेबाबत कुठेही वाच्यता केल्यास मारुन टाकण्याची धमकी दिली, असे पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या ३७६, ३५४, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पीएसआय धनंजय रत्नपारखी पुढील तपास करीत आहेत.