अकोला - लाच प्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या एसीबीच्या एका कर्मचाऱ्यावर पिंजरच्या ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांनी गोळी झाडली. सचिन धात्रक असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. गोळी उजव्या हाताच्या करंगळीवर आणि उजव्या पायाच्या अंगठ्यावर लागली आहे. ही घटना पिंजर पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी घडली.
या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या ठाणेदाराची दोन दिवसांआधी पोलीस निरीक्षक पदी बढती झाली होती. पिंजरचे ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांच्यावर अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा बडगा उगारला होता. एसीबीचे पोलीस कर्मचारी सचिन धात्रक हे कारवाईसाठी गेलेल्या पथकांमधील एक कर्मचारी होते.
कारवाई सुरू असताना ठाणेदार नागलकर यांनी स्वतः जवळ असलेली शासकीय सर्व्हीस रिव्हॉल्वर काढण्याच्या प्रयत्न केला. हा प्रकार त्यांच्यासमोर उभे असलेले एसीबीचे पोलीस कर्मचारी धात्रक यांच्या लक्षात येताच त्यांनी रिव्हाल्वर काढण्यापासून रोखले. या झटापटीमध्ये बंदुकीतून एक गोळी झाडली गेली. त्यामध्ये सचिन धात्रक यांच्या उजव्या हाताला व उजव्या पायाला गोळी लागली.
यानंतर एसीबीने ठाणेदार नागलकर यांच्यावर अटकेची कारवाई करीत जखमी धात्रक यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसाआधी ठाणेदार नागलकर यांची बढती झाली होती. ते पोलीस निरीक्षक म्हणून अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रात रुजू होणार होते. तसेच ठाणेदार नागलकर हे माजी सैनिकही आहेत.