अकोला - नवनाथ महाराज मंदिर परिसरात शुक्रवारी अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह अढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी आज घटनास्थळी भेट दिली. त्यांनी मृतदेहाच्या जवळ सापडलेल्या वस्तुंची पोलीस ठाण्यात पाहणी केली.
न्यू तापडिया नगरातील नवनाथ मंदिर परिसरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याची माहिती सिव्हील लाईन पोलीस ठाण्याला मिळाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून परिसराची पाहणी केली. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. घटनास्थळी श्वानपथक आणि मोबाईल कारही दाखल झाली.
मृतदेह अर्धवट जळालेला असून मृतदेहाजवळ एक स्लीपर सापडली होती. मृत व्यक्तीच्या अंगात हिरव्या रंगाची जळालेली पॅन्ट, निळ्या रंगाचा जळालेला शर्ट आणि अंतर्वस्त्र या व्यतिरिक्त मृतदेहाजवळ दुसरे काहीच मिळाले नाही. हा घातपात असण्याची शक्यताही ठाणेदार विनोद ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. दुसरा कोणताच पुरावा पोलिसांकडे नसून मृताची ओळख आणि मारेकऱ्यांची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा, सायबर गुन्हे शोध विभागासह शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.
मृतदेह जाळल्याची शक्यता -
दुसऱ्या ठिकाणी मारून मृतदेह इथे जाळल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मृताच्या डोक्यावर मारल्याच्या खुना असल्याचे समोर आले आहे. हा मृतदेह दुसऱ्या जिल्ह्यातील किंवा परराज्यातील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.