अकोला - सुनेने फासी लावून आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या पती, सासरा व सासूचा डाव जुने शहर पोलिसांनी उघड केला. तिन्ही संसयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. घरगुती कारणावरुन सुमय्या परवीन शेख इमरान या सुनेचा पती शेख इमरान शेख जब्बार, सासरा शेख जब्बार शेख सत्तार, सासू रजिया बी शेख जब्बार यांनी गळफास देऊन खून केला होता. ही घटना गुलवाडे प्लॉट येथे घडली.
गुलवाडे प्लॉट येथे शेख इमरान याचा विवाह एक जानेवारी 2020 मध्ये सुमय्या परवीन हिच्याशी झाला होता. माहेरून पैसे आणण्यासाठी पती, सासरा नेहमी तिला तगादा लावत होते. त्यावरून त्यांच्यामध्ये रोज भांडण होत होते. शेख इमरान व सासरा शेख जब्बार हे मिस्त्रीचे काम करत होते. पैसे आणण्यावरून पती, सासरा आणि सासू यांनी तिचा रविवारी रात्री छळ केला. त्यानंतर या तिघांना ही राग अनावर झाला. त्यांनी तिचा कपड्याच्या सहाय्याने गळा आवळला. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिने गळफास घेतल्याचा बनाव या तिघांनी केला. या तिघांनी तिला तत्काळ सकाळी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.
याप्रकरणी जुने शहर पोलीस उपनिरीक्षक सुजित कांबळे यांनी यामध्ये सकाळी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. त्यानंतर पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांना शंका आल्याने डीबी पथकास तपास करण्याचे आदेश दिले. डीबी पथकाने यामध्ये पती शेख इमरान, सासरा शेख जब्बार, सासू रजिया बी हिला चौकशीसाठी बोलाविले. तसेच वैद्यकीय अहवालावरून पोलिसांची शंका खरी ठरली. चौकशीअंती या तिघांनी गळफास देऊन तीचा खून केल्याचे कबूल केले.
जुने शहर पोलिसांनी यामध्ये पती, सासरा, सासू या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली. पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुजित कांबळे, सदाशिव सुळकर, अनिस पठाण, महेंद्र बहादूरकर, अनिल खेडेकर, नितीन मगर, धनराज बायस्कर यांनी कारवाई केली.