अकोला - सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी दाम्पत्याचा खून करून त्यांच्या घरातील पाच लाख 70 हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्या भाडेकरूंना स्थानिक गुन्हे शाखेने बारा तासांच्या आत अटक केली केली. मोहम्मद रफिक मोहम्मद हमजा, मेहमुदाबी परवीन वसीम खान या भाडेकरूंच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मारेकऱ्यांनी या वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूचा केलेला बनाव फसल्याने त्यांचे पितळ उघडे पडले.
खदान पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या बळवंत कॉलनीमध्ये सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी नथुराम उंदराजी भगत व त्यांची पत्नी हेमलता भगत यांची हत्या करून त्यांच्या घरातील पाच लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज आणि रोख 70 हजार रुपये रोख जबरीने चोरून नेले. या दोघांचे मृतदेह जाळून अपघात असल्याचे भासविण्यासाठी पुरावा नष्ट केला. याप्रकरणी वंदना पांढेन यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या घटनेत भादवी कलम 302, 394, 34 नुसार गुन्हा दाखल केला.
पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, खदान पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक छाया वाघ, सहायक पोलीस उपनिरीक्षक जयंत सोनटक्के, राजपालसिंह ठाकुर, गणेश पांडे, किशोर सोनोणे, शक्ती कांबळे, अश्विन मिश्रा, वीरेंद्र लाड, संदीप ताले, गणेश सोनोणे, संदीप काटकर, शंकर डाबेराव आदींनी तपासाला सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडे असलेले भाडेकरूंचा शोध घेतला. त्यानुसार पोलीस जुने शहरातून मोहम्मद रफिक मोहम्मद हमजा, मेहमुदाबी परवीन वसीम खान या दोघांचा शोध घेतला. तपासमध्ये या दोघांनी हा गुन्हा केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना 24 तासांच्या आत अटक केली. या घटनेचा पुढील तपास खदान पोलीस करत आहेत.