अकोला - कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना जिल्ह्यात कडक संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसाआधी दिले होते. ही संचारबंदी आज रात्री 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही संचारबंदी 15 मेच्या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार आहे. या आदेशानंतर खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंसह इतरही दुकाने यानिमित्ताने सुरू झाली होती.
खरेदीसाठी नागरिकांची गर्दी -
अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज 500 च्यावर जात आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. ही संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी 6 दिवस कडक संचारबंदीचे आदेश दिले होते. या आदेशानंतर जिल्ह्यात किराणा दुकान, भाजीपाल्याची दुकानांवर खरेदीसाठी गर्दी निर्माण झाली होती. यासोबतच औषधींच्या दुकानांवरही गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे, भाजीपाल्याचे दर आज तर गगनाला पोहोचले होते. 6 दिवस भाजीपाल्याची दुकाने बंद राहणार असल्याने या संधीचा फायदा घेत भाजी विक्रेत्यांनी भाजीपाल्याचे दर वाढवले होते.
पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैनात -
चौकाचौकात पोलिस कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते. त्यासोबतच महापालिकेचे कर्मचारीही रस्त्यावर गस्त घालत होते. सकाळी 11 नंतरही बरीच दुकाने उघडी होती. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही दुकाने बंद केली. काही इतर वस्तूंची व कपड्यांची दुकाने दुकानाचे शटर खाली करून सुरू होती. त्या दुकानानाही मनपाच्या कर्मचाऱ्यांनी बंद केले. तरी पण दुपारी 1 वाजेपर्यंत रस्त्यावरील गर्दी काही प्रमाणात कमी झाली होती. पोलीस यावेळीही ॲक्शन मूडमध्ये नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या या संपूर्ण संचारबंदीच्या आदेशाचे खऱ्या अर्थाने पालन होत आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला होता.
हेही वाचा - जगातील अव्वल टेनिसपटू अश्ले बार्टीचा पराभव करत आर्यनाने पटकावले माद्रिद ओपनचे विजेतेपद