अकोला - जिल्ह्यातील 12 पैकी आठ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच चार जणांचे नमुने काढण्यास आणखी काही दिवस वेळ आहे. दरम्यान, अकोल्यात आतापर्यंत 14 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह सापडले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू तर एकाने आत्महत्या केली होती. त्यामुळे अकोल्यातील कोरोना रुग्णांची संख्या 12 राहिली आहे.
अकोल्यात 14 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्यापैकी एका रुग्णाने आयसोलेशन वार्डात आत्महत्या केली होती. तर एकाचा मृत्यू झाल्यानंतर तो पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, 12 जणांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. त्यापैकी आठ जणांना गेल्या सात दिवसांवर उपचार सुरू होते. त्यांच्या घशाचे नमुने घेण्यात आले. त्यांचा पहिला अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे, यात अकोल्यातील बैदपूरा भागातील पहिल्या रुग्णाचाही समावेश आहे. इतर चार जणांवर उपचार सुरू होऊन सात दिवस झाले नसल्याने त्यांचे नमुने काढण्यात आले नाही. कोरोना संदिग्ध रुग्णांमध्ये 45 रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. आजपर्यंत 285 जणांची तपासणी करण्यात आली असून 238 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.