अकोला- मेळघाट व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या सातपुड्याच्या जंगलात शिकार करण्यासाठी लावण्यात आलेल्या फासात अडकल्याने एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मेळघाटमध्ये शिकारी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. बिबट्या एक वर्षाचा असल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले.
तेल्हारा तालुक्यातील खंडाळा गावाच्या लगत सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जमुना नदीमध्ये शिकार्यांनी बिबट्याच्या शिकारीसाठी फास लावला होता. त्यामध्ये बिबट्या अडकला. या फासातून सुटका करून घेण्यासाठी धडपड करत असताना बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्याच्या मृत्यूबद्दल वन विभागाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
या घटनेमुळे बिबट्या, वाघाचे अधिवास क्षेत्र शिकाऱ्यांना माहीत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. बिबट्याचा मार्ग, त्या मार्गावरुन येण्याची त्यांची वेळ याची अचूक माहिती शिकाऱ्यांकडे असल्याचे याआधीही वारंवार अधोरेखित झाले होते. आतापर्यंत या भागात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.