अकोला - शहरातील गणेश मंडळांना एकाच ठिकाणी सर्व परवानगी मिळण्याकरिता महापालिकेकडून 'एक खिडकी योजना' कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेमुळे गणेश मंडळांची विविध विभागांकडून परवानगी घेण्यासाठी होणारी धावपळ थांबणार आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांद्वारे नियमानुसार मंडप परवानगी, विद्युत जोडणीसाठी महावितरणची परवानगी, लाउडस्पीकरसाठी पोलीस विभागाची परवानगी, रस्त्यालगत मंडप उभारणीकरीता शहर वाहतूक विभागाची परवानगी, तसेच महानगरपालिका नगररचना, अग्निशमन व बांधकाम विभागाची परवनगी घेणे अनिवार्य असते.
शहरातील गणेश भक्तांना, मंडळांना वरील परवानग्या मिळणे सोईचे व्हावे याकरिता पोलीस प्रशासन, महावितरण व महागनरपालिका प्रशासनच्यावतीने देण्यात येणाऱ्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी देण्यात येणार आहेत. याकरिता अकोला महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे एक खिडकी योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मंडळांनी घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.