अकोला - विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ग्रामसेवकांचे क्रांती दिनापासून राज्यव्यापी असहकार आंदोलन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे धरणे आंदोलन करण्यात आले होते.
ग्रामसेवक पद रद्द करण्यात येऊन पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करणे, ग्रामसेवक संवर्ग खास प्रवास भत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करण्यात यावा, ग्रामसेवकांची शैक्षणिक अहर्ता पदवी करावी, ग्रामसेवक वेतनातील त्रुटी दूर कराव्यात, सन 2005 नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांना आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी, ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामे कमी करण्यात यावीत. यासह विविध मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे दिले. या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात विभागीय आयुक्त कार्यालयावर धरणे देण्यात येणार आहे. ग्रामसेवकांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी ग्रामसेवक एकवटले आहे.