अकोला - महिलांना आजही पुरुष प्रधान संस्कृतीत दुय्यम स्थान आहे. तरीही महिला आज जगभरात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुरुषांसोबत उभे राहत आहे. परंतु, अशातच महिलांची दर महिन्याला मासिक पाळी असतेच. महिलांसाठी ही नित्याची आणि लाजिरवाणी बाब असली तरी त्यांना या काळात धीर, आधार देण्याची गजर आहे. मात्र, 21 व्या शतकातही महिला त्या दिवसांवर बोलण्यास तयार नाहीत किंवा त्यावर चर्चाही कोणी करीत नाही.
आजही मासिक पाळी म्हणजे समजतात विटाळ
नुकताच काल (28 मे) जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस झाला. भारतात आजही अनेक ठिकाणी मासिक पाळीला विटाळ आणि निषिद्ध मानले जाते. आपल्या देशात याबद्दल प्रचंड मोठे गैरसमज आहेत. जवळपास सगळीकडेच यावर खुलेपणाने बोलणेही टाळले जाते. मात्र, अशा परिस्थितीत स्त्रिला समजून घेण्याची व स्विकारण्याची हिच वेळ असते. परंतु, भारतीय संस्कृतीतील रूढी आणि परंपरा यामुळे महिलांमधील मासिक पाळी आजही कठीण आहे, जेवढी ती आधीच्या काळी होती.
क्षितिज स्वयंसेवी संस्था करते गैरसमज दूर
महिलांना मासिक पाळीच्या दिवसात एकटेच राहण्यास भाग पाडले जाते. हा काळ त्यांना वाळीत टाकण्यासारखाच वाटतो. परंतु, महिलांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी काही महिलांच्या संघटना समोर येत आहेत. महिलांना समाजात स्थान मिळावे, यासाठी काही महिला उभ्या राहिल्या आहेत. अशीच एक क्षितिज स्वयंसेवी संस्था आहे. जी संस्था महिलांसाठी काम करण्यास पुढे आली आहे. क्षितिज स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक संचालक स्नेहल चौधरी कदम या मासिक पाळीच्या संदर्भातील समज-गैरसमज दूर करण्यासाठी विविध कार्यक्रम घेत आहेत. तसेच समाजात जनजागृती करीत आहेत. या संस्थेने समाजामध्ये या विषयावर तज्ञांचीही मदत घेतली आहे. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी मानसोपचार तज्ञांद्वारेही प्रबोधन केले जाते.
हेही वाचा - 'कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकार उचलणार'