अकोला - 'ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित न झाल्याने माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आयकॉन हॉस्पिटलमधील कर्मचारी व येथील मॅनेजमेंटवर कारवाई करावी', अशी मागणी लोकेश गुरबानी व त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे. याबाबतचे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज (20 मे) दिले.
'हॉस्पिटल कर्मचारी-मॅनेजमेंटचा निष्काळजीपणा'
'माझे वडिल गोपालकुमार गुरबानी यांच्यावर आयकॉन हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला होता. सकाळी त्यांची ऑक्सिजन लेव्हल 94 ते 95 होती. दुपारी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. ऑक्सिजन पुरत नसल्याने त्यांचा त्रास वाढला होता. ऑक्सिजन मिळत नसल्याचेही येथील कर्मचारी आणि मॅनेजमेंटला सांगितले. परंतु, त्यांनी त्यावर काहीच प्रतिसाद दिला नाही. काही वेळाने वडिलांचे निधन झाले', असे गोपालकुमार यांचा लोकेश गुरबानी यांनी म्हटले आहे.
कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
'ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित न झाल्याने माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. याबाबत हॉस्पिटल प्रशासन व कर्मचाऱ्यांना माहिती देऊनही त्यांनी त्यामध्ये निष्काळजीपणा दाखविला. त्यामुळे वडिलांचा जीव गेला. त्याच दिवशी या हॉस्पिटलमधील जवळपास सहा रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे समजले आहे. त्यामुळे या हॉस्पिटलवर कारवाई करावी', अशी मागणी लोकेश गुरबानी यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
हॉस्पिटल प्रशासनाने आरोप फेटाळले
तर हॉस्पिटल प्रशासनानेही हे आरोप फेटाळत आपली भूमिका मांडली आहे. 'त्यांचे म्हणणे योग्य नाही. इतरही रुग्ण त्याठिकाणी उपचार घेत होते. प्रत्येकांना वेगवेगळी व्यवस्था नाही. त्यांच्यासारखा त्रास इतरही रुग्णांना झाला असता. तरीही यासंदर्भात उद्या (21 मे) आमच्या व्यवस्थापनाची बैठक आहे. त्यामध्ये चर्चा करून निर्णय घेण्यात येईल', अशी प्रतिक्रिया आयकॉन हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. के. के. अग्रवाल यांनी दिली आहे.
हेही वाचा -आंतरराष्ट्रीय नेमबाज मोनाली गोऱ्हेंचं कोरोनामुळे निधन, सकाळीच वडिलांचाही मृत्यू