अकोला - अकोल्यात आज सकाळी प्राप्त अहवालानुसार, 49 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. गुरुवारी नऊ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यासोबतच सलग पाचव्या दिवशी एका वृद्ध रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्राप्त अहवालात 22 महिला व 27 पुरुषांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
पूर पीडित कॉलनी येथील नऊ, अकोट फैल येथील सात, शिवर येथील चार, बाळापूर येथील तीन, मोठी उमरी येथील तीन, खदान येथील तीन, रेल्वे क्वार्टर येथील तीन, गुलजार पुरा येथील तीन, सिंधी कॅम्प येथील दोन, पातूर येथील दोन, जुने शहर येथील दोन, तर तारफैल, संतोषी माता मंदिर जवळ, छोटी उमरी, गितानगर, विजय नगर, शंकर नगर, भगतवाडी डाबकी रोड, टेलिफोन कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळनंतर नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, त्यातील चार कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित पाच जणांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, 11 जूनला रात्री एका 78 वर्षीय पुरुष रुग्णाचे उपचार घेताना निधन झाले. हा रुग्ण बाळापूर येथील रहिवासी होता. त्यास 7 जूनला दाखल करण्यात आले होते.
प्राप्त अहवाल - १४४
पॉझिटिव्ह - ४९
निगेटिव्ह - ९५
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - ९६३
मृत - ४४ (४३+१)
डिस्चार्ज - ५८६
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) - ३३३