अकोला - पुणे येथील भाजप आमदार यांनी मनपा महिला अधिकाऱ्यांना केलेल्या अर्वाच्य भाषेतील शिवीगाळ प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाची ही परंपरा आहे. त्यांचे मूळ संघ आहे, त्यामध्ये या पद्धतीचे शिक्षण दिले जाते. महिलांचा सन्मान हा भाजपामध्ये नाही असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोमवारी अकोल्यात केला आहे. ते सिटी कोतवाली चौकात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मोटारसायकल रॅलीत सहभागी झाले होते यावेळी ते बोलत होते.
भाजपा महिलांच्याही विरोधात -
भाजपाची ही परंपरा आहे. त्यांचे मूळ संघ आहे, त्यामध्ये या पद्धतीचे शिक्षण दिले जाते. महिलांचा सन्मान हा भाजपामध्ये नाही. हा एकच आमदार नाही साटम आणि पंढरपूरचा आमदार परिचारक यांचाही त्यात समावेश आहे. परिचारक यांनी तर जे आपल्या देशाचा संरक्षण करतात त्यांच्या महिलांच्याबद्दल अपशब्द काढले होते. या भाजपाला महिलांच्या बद्दलचा किती सन्मान आहे हे यावरून वारंवार सिद्ध होत आहे. भाजपा जसे मागासवर्गीय आरक्षणाच्या विरोधात आहे तसे महिलांच्याही विरोधात आहे हे यावरून सिद्ध होते, असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोमवारी अकोल्यात बोलताना म्हणाले. तसेच आनंद अडसूळ आणि त्यांच्या मुलाला ईडीने लावलेल्या चौकशीबाबत पटोले यांनी तीव्र प्रतिक्रिया देत भाजपा व त्यांनी केलेल्या तपास यंत्रणेवर घणाघाती आरोप केले आहे.
ईडी आणि सीबीआय तपास यंत्रणेचा गैरवापर -
सेनेचे माजी खासदार आणि नेते आनंद अडसूळ आणि त्यांच्या मुलांची चौकशीसंदर्भात त्यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, मी वारंवार सांगतोय ईडी आणि सीबीआय याचा दुरुपयोग जेव्हा भाजप केंद्रसरकारमध्ये आले तेव्हापासून या दोन्ही तपास यंत्रणेचा गैरवापर करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम आपण पाहतो आहे; ईडी आणि सीबीआय हे फार मोठे संकट आहे, हे फार मोठा तपास करीत आहे, असे कुठलेही कारण आता राहिले नाही. केंद्र सरकारने ईडी आणि सीबीआय ज्यांच्यावर लावले त्यांना अजूनपर्यंत कुठलीही शिक्षा झालेली नाही. भुजबळ हे मागासवर्गीय नेते होते. म्हणून फडणवीसांच्या सरकारमध्ये त्यांना दोन वर्षे जेलमध्ये टाकून ठेवले. पण उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले आहे. याचाच अर्थ सत्तेचा दुरुपयोग करून विरोधी लोकांना इंग्रजांसारखे, हुकूमशहा सारखे या देशांमध्ये ईडी आणि सीबीआयचा वापर करून ते त्या पद्धतीचा उपयोग करत आहेत. अडसूळ यांना नोटीस आली असेल त्याला आता कोणालाही घाबरण्याचे कारण नाही, असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा - महाविकास आघाडी सत्तेत असतानाही पोटनिवडणुकीत भाजपचा वरचष्मा!