अकोला - महानगरपालिकेत दोन वर्षांपासून 2 कोटी 40 लाख रुपये दिव्यांग कल्याण निधी खर्च न झाल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार लेखा विभागाच्या प्रमुख सहाय्यक रंजना विश्वनाथ घुले यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले.
लेखा विभागाच्या प्रमुख सहाय्यक रंजना घुले यांच्याकडे दिव्यांग कक्ष प्रमुख म्हणून कामकाजाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती. दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणार्थ योजना राबवण्यासाठी 2017-18 साठी 1 कोटी रुपये आणि 2018-19 साठी 1 कोटी 40 लाख रुपयांची तरतुद महानगरपालिकेच्या सुधारित अंदाजपत्रकात करण्यात आली होती.
हेही वाचा - वाशिम जिल्ह्यात 'महिलाराज'... सर्व पंचायत समितींवर महिला 'कारभारणी'
15 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीमध्ये हा निधी खर्च झाला नसल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून संबधित विभागाच्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले. महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी रंजना घुले यांच्या निलंबनाचे आदेश काढले.