अकोला - उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी अकोल्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये आयोजित कार्यक्रमात आज ते अकोल्यात बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, टीव्हीवर एक टरबूज आले होते. त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे विज बिल माफ करावे अशी मागणी केली होती. त्यावर सांवत यांनी बाळा आता तू सत्तेत आहेस ना, कर ना मग वीज बिल माफ, असा टोला फडणवीसांना लगावला.
पश्चिम विदर्भावर अन्याय - राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना दिवसा दिवसभर वीज दिली. मात्र, पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना रात्री वीज देण्यात येते. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असतानाही पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भावर हा अन्याय का? असा सवाल आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला. अकोल्याचे पालकत्व तुम्ही घेतलेले आहे. त्यामुळे पालक म्हणून या शेतकऱ्यांची जबाबदारी तुमच्यावर आहे. शेतकऱ्यांना दिवसभर वीज द्या, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केली.
कृत्रिम संकटाचा सामना : खरिपातील असणारी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना रब्बीमधून दिलासा मिळण्याची आस होती. परंतु, महावितरणच्या विजेच्या पुरवठा संदर्भातील असलेले वेळापत्रक हे शेतकऱ्यांच्याच मानगटीवर बसत असल्याचे दिसते. काही भागांमध्ये दुपारी तर काही गावांमध्ये रात्री वीज पुरवठा करण्यात येत असल्याने शेतकरी रात्री शेतात पिकांना पाणी देत असल्याचे चित्र आहे. युवकांपासून तर वृद्धांपर्यंत शेतकरी महावितरणच्या अफलातून कारभारामुळे त्रस्त आहे.
पिकाचे मोठे नुकसान : यावर्षी पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, तूर, मूग पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर कसेबसे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आणि पुन्हा एकदा जोमाने गहू, हरभऱ्याची उसनवारी कर्ज घेऊन पेरणी केली. परंतु, शेतकऱ्यांच्या समस्या काही सुटता सुटेना. अजूनही विजेचा तुटवडा हा शेतकऱ्यांच्याच नशिबी येत आहे. त्यामुळे शेतकरी जेव्हा विज पुरवठा होत असेल त्यावेळी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी दिसत आहे.
रात्रीचा पुरवठा : महावितरणच्या वीज पुरवठ्याच्या अवेळी असलेले वेळापत्रक शेतकऱ्यांची झोप उडवीत आहे. परिणामी शेतकरी कुठलाच पर्याय नसताना शेतातील पीक जगविण्यासाठी शेतात हिवाळ्याच्या कडक थंडीत थंड पाण्यात शरीर भिजवून पिकांना पाणी देत आहे. काही गावामध्ये सकाळी, काही गावांमध्ये दुपारी तर काही गावात रात्रीचा पुरवठा होत आहे. ही वीज आठ ते दहा तास देण्यात येत असली तरी पुरवठा होत असताना बऱ्याच ठिकाणी भारनियमन ही शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. परिणामी, रात्री शेतकऱ्यांना पुन्हा पुरवठा केव्हा सुरू होतो, याची वाट पाहत रात्र शेतातच काढावी लागत असल्याचे वास्तव आहे.
शेतकरी त्रस्त : रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देताना वन्यप्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती आहे. रात्रीची वीज न देता सकाळी किंवा दुपारी दिल्यास पिकांना व्यवस्थित पाणी दिल्या जाते. भितीपोटी शेतातील रात्रीची कामे होत नाही, पिकांनाही व्यवस्थित पाणी दिल्या जात नसल्याने काही भागातील पीक करपत आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी रामा गावंडे यांनी दिली. महावितरणच्या बेजबाबदार वेळापत्रकामुळे शेतकरी त्रस्त आहे. पिकांना पाणी देण्यासाठी मजूर ही येण्यास तयार नाही. रात्रीची मजुरी जास्त द्यावी लागते. काम कमी होते. त्यामुळे महावितरणने दुपारी वीज पुरवठा करावा, अशी मागणी युवा शेतकरी आशिष काळे यांनी दिली.
वीज पुरवठ्यामुळे शेतकरी हैराण : अति पावसामुळे खरीप पीक हातचे गेले. त्यात हवे तसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बीवर आशा होती. परंतु, आता नैसर्गिक नाही तर कृत्रिम संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. रात्रीचा दिवस करून शेतकरी शेतात राबत आहे. किमान रब्बीत तरी चांगले उत्पन्न होईल. परंतु, महावितरणच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे महावितरणने रात्रीच्या ऐवजी सकाळी व दुपारी वीज पुरवठा करावा, एवढीच मागणी शेतकरी महावितरण आणि शासनाकडे करीत आहे.