अकोला - अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडून 48 तासांपेक्षा जास्त मुदतवाढ मिळण्यासाठी अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांची आज भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांच्याशी संपर्क साधाला.
चर्चेदरम्यान संबंधित विमा कंपनीने 48 तासाहून जास्त मुदतवाढ देण्यासाठी आमदार सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून मुदतवाढीची मागणी केली.
शेतकऱ्यांना अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत वेळ लागत असल्याचे सावरकरांनी सांगितले. तसेच अजूनही महसूल अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने पंचनामा करण्याची प्रक्रिया लांबल्याचे त्यांनी सांगितले.
यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्य सचिव यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली.
यासंदर्भात तत्काळ आदेश काढण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी आमदार सावरकर यांना दिले. यावेळी जिल्ह्यातील विविध भागातील शेतकरी तसेच सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.