अकोला - जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडू ( MLA Bacchu Kadu got clean chit ) यांच्यावर निधी अपहार प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तापासामध्ये सिटी कोटवाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करीत जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या तपसांती या प्रकरणात माजी पालकमंत्री बच्चू कडू यांचा कुठलाही प्रत्यक्षपणे सहभाग दिसून येत नाही. त्यामुळे, या प्रकरणात पोलिसांनी बच्चू कडू यांना क्लिनचिट ( Bacchu Kadu latest news ) देत प्रकरण न्यायालयात सादर केले आहे.
फिर्यादी धैर्यवर्धन पुंडकर यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे माजी राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर न्यायालयात धाव घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश आणले होते. त्यानुसार, सिटी कोतवाली पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून गुन्हा दाखल केला होता. या संदर्भामध्ये सिटी कोतवाली पोलीस यांनी बच्चू कडू यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर या प्रकरणाचा तपास केला. या तपासामध्ये जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद, आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडून प्राप्त झालेल्या कागदपत्र व अहवालावरून या प्रकरणी कोणताही दखलपात्र गुन्हा होत नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याची तक्रार ही गैरसमजुतीने दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अर्ज निकाली काढून माजी पालकमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांना क्लिनचीट दिली आहे.
यांनी मागितली माहिती - हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका, कानडखेडा येथे राहणारे विजय ज्ञानबा राऊत यांनी या प्रकरणासंदर्भात सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे माहिती मागितली होती. त्यानुसार सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांनी दिलेल्या माहितीनुसार माजी पालकमंत्री बच्चू कडू यांना अपहार प्रकरणात क्लीन चिट दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय आहे प्रकरण? - अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून पालकमंत्री बच्चू कडू यांनी 1 कोटी 95 लाखांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या 13 कामांना स्थगिती दिल्याने पालकमंत्री कडू यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचितने केली होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवेधन पुंडकर यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने यामध्ये कमल 156 (3) नुसार पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.