अहमदनगर- जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एका गरीब कुटुंबातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच दोन नराधमांनी जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना घडली. चिंभळा शिवारातील धारकर वस्तीमध्ये ही घटना घडली. सुमारे ५ महिन्यांपासून वेळोवेळी मुलीवर अत्याचार केल्यामुळे सदर पीडित अल्पवयीन मुलगी ३ ते ४ महिन्याची गर्भवती राहिली आहे. भानुदास गंगाराम भिसे (वय ३०) व नामदेव अंबू आडगळे (वय ६५) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर बलात्कार तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, चिंभळा शिवारातील धारकर वस्ती येथील भानुदास गंगाराम भिसे (वय ३०) याने गावातीलच एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर प्रेमाचे नाटक करत गेल्या ५ महिन्यांपासून अत्याचार केला. दरम्यानच्या काळात शेजारी राहत असणारा नामदेव अंबू अढागळे (वय ६५) याला हे समजली. त्यानंतर त्याने पीडितेच्या घरी कुणी नसताना घरात घुसून मी तुझ्या आई-वडिलांना व नातेवाईकांना ही गोष्ट सांगेल, अशी धमकी देवून वृद्धाने देखील पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
सदर पीडित मुलीच्या पोटात काही दिवसांपासून दुखू लागल्याने तिच्या आईने तिला प्रथम श्रीगोंदा कारखाना येथे व नंतर खासगी दवाखान्यात नेले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सोनोग्राफी करण्यास सांगितले. त्यामुळे सदर मुलीच्या आईने काष्टी येथील एका खाजगी दवाखान्यात तपासणी केली. तपासणीनंतर सदर मुलगी तीन ते चार महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
यानंतर मुलीस विश्वासात घेऊन तिच्या आईने याबाबत विचारले असता तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती आईस सांगितली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.