अकोला - गोवंश जनावरांची तस्करी करीत असल्याची माहिती पोलिसांना देत असल्याच्या संशयातून एकाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना जिल्ह्यात घडली आहे. ही घटना अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव परिसरात शनिवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य दोन आरोपींना अटक केली असून इतर चौघे फरार आहेत.
नायगाव परिसरात राहणारे शेख सिकंदर शेख युनूस कुरेशी हे रात्री त्यांच्या घराजवळ उभे होते. यावेळी रेहान कुरेशी, शेख सलीम उर्फ बल्ली हे दोघे तेथे आले आणि तू आमची मुखबिरी का करतोस असे म्हणून कुरेशी यांच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेनंतर आरोपीच्या चार साथीदारांनी शेख सिकंदर यांचा भाऊ शेख इर्शाद शेख युसुफ कुरेशी यांना व त्यांच्या वडिलांना मारहाण केली आणि त्यांची गाडी फोडली. . याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करीत मुख्य दोन आरोपींना अटक केली आहे. तर इतर चौघे फरार आहेत.