अकोला - मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळ कार्यालयांच्या जिल्हा व्यवस्थापकासह एकास ४ हजार रुपयांची लाच घेताना आज (बुधवारी) अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. जिल्हा व्यवस्थापक संजय बळीराम पहुरकर व शेख सादिक शेख गुलाम असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार यांची शैक्षणिक कर्ज फाईल मुंबई मुख्य कार्यालय येथे पाठविण्याकरीता जिल्हा व्यवस्थापक संजय बळीराम पहुरकर याने तक्रारदाराकडे ७ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराला ही मागणी मान्य नसल्याने त्यांने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर एसीबीने आज (२१ ऑगस्ट) तक्रारीची पडताळणी केली. तक्रारदाराने जिल्हा व्यवस्थापक पहुरकर यास पंचायत समक्ष लाचेची ४ हजार रुपयांची रक्कम दिली. ही रक्कम पहुरकर याने रोजंदारीवर असलेल्या शेख सादिक शेख गुलाम याच्याकडे दिली. त्यानंतर कार्यालयाच्या परिसरात दबा धरुन बसलेल्या एसीबीच्या पथकाने या दोघांनाही पैसे घेताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे मौलाना अब्दुल कलाम विकास महामंडळाच्या कार्यालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.