अकोला - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर घोषणांच्या निनादात अकोल्यातील मानाचा बाराभाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. गणपतीचे पूजन करून जय हिंद चौकातून गुरुवारी सकाळी मिरवणुकीला सुरुवात झाली. दिंडीच्या तालावर आणि साम्राज्य ढोल ताशा पथकाच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच कडेकोट पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता. याठिकाणी आमदार, खासदार व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
हेही वाचा - मुंबईतील गणेश विसर्जन : बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..!
मानाचा बाराभाई गणपतीचे चौकाचौकात स्वागत आणि पूजन करण्यात आले. जयहिंद चौकात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार, महापौर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त जितेंद्र कापडणीस तसेच विविध पक्षांचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव शांतता समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्यासह भाविकांच्या उपस्थितीत गणपतीची पूजा करण्यात आली. त्यानंतर हा गणपती गुलालाच्या उधळणात मार्गस्थ झाला. अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरातील गणपतीचे व इतर पाच मानाच्या गणपतीचे पूजन करून मिरवणुकीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
केंद्रीय राज्यमंत्री आणि दोन आमदारांची गैरहजेरी
अकोल्यातील मानाचा गणपती असलेल्या बाराभाई गणपतीचे पूजन करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. या पूजेला खासदार-आमदार नेहमी हजर असतात. परंतु, यावेळेस पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यासह त्यांच्या गटातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा यांच्यासह त्यांच्या गटातील पदाधिकारी हे मंचावरही दिसून आले नाही. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चेला उत आले आहे.