अकोला - वाडेगावजवळील पिंपळखुटा गावच्या हद्दीत आज दोन मृत बिबट्या सापडल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही मृत बिबट्या गावच्या हद्दीत एका शेतात सापडले असून याच ठिकाणी एक मुंगूस देखील मृत्यूमुखी पडले आहे. जवळच असलेल्या विद्युत विभागाच्या तारेचा स्पर्श झाल्याने नर मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.
नर, मादी बिबट्यांचा मृत्यू
वाडेगाव जवळील पिंपळखुटा राहनारे रस्त्यावर असलेल्या नितीन खरप यांच्या शेत शिवारातील तुळसाई मंदिराच्या पाठीमागच्या भागात नर, मादी बिबट्या मृत अवस्थेत आढळुन आले. ही घटना गावकऱ्यांच्या लक्षात येताच गावकऱ्यांनी ही बाब वनविभागाला कळवली. यानंतर या ठिकाणी क्षेत्रीय कार्यरत वनकर्मचारीमार्फत ही बाब वरिष्ठ वनाधिकारी यांना कळविताच तात्काळ वनविभागाचे अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी (चमू) घटनास्थळी धाव घेतली.
मृत नर, मादी बिबट्याचे सर्व अवयव शाबूत होते. याच ठिकाणी विद्युत महामंडळाच्या पावर सप्लाय असल्याने विजेचा धक्का (शॉक) लागून नर, मादी बिबट्या व एका मुगसाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. संबंधित घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, मृत बिबट्यांना शवविच्छेदनासाठी अकोला वन विभागाकडे पाठवण्यात आले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.