अकोला - अकोला, अमरावती जिल्ह्यातील काही भागांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे पूर्णा नदीला आज सकाळपासून पूर आला आहे. या पुरामुळे अकोट तालुका आणि मध्य प्रदेशकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. यासोबतच अकोट तालुक्याशी पूर्णपणे संपर्क तुटला आहे. या पावसाळ्यातील या नदीला पहिलाच पूर आहे. या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
बहुतांश जिल्ह्यांमध्ये संततधार
अकोला जिल्ह्यातून वाहणारी पूर्णा नदी दुथडी भरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे अकोला-अकोट महामार्ग बंद झाला आहे. गांधीग्राम येथील ब्रिटिशकालीन पुलावरून पाणी वाहत असल्याने अकोला जिल्ह्याचा अकोट तालुक्याशी संपर्क तुटला आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये संततधार सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून नदीकाठावरील नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये अमरावती, अकोला जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे पूर्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.
पोलीस बंदोबस्त
परिणामी, पूर्णा नदीला मोठा पूर आला असून अकोला जिल्ह्यातून वाहणारी पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामध्ये अकोट-अकोला महामार्गावरील पूर्णा नदीवर असलेल्या पुलाच्या पाच फूटावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अकोल्याचा अकोट तालुक्याशी संपर्क तुटला आहे. तर बैतुलकडे जाणारा मार्गही बंद झाला आहे. दरम्यान, या पुलावरून प्रवास करणे टाळावे तसेच परिसरातील गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच दहीहंडा पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक बंद केली असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. अकोल्यातील बरेच नागरिक हा पूर पाहण्यासाठी गांधीग्राम येथे येत आहेत.