अकोला - स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेतही पकड असलेल्या भारिप बहुजन महासंघ म्हणजे सध्याची वंचित बहुजन आघाडीची या निवडणुकीत पुरती वाट लागली आहे. या निवडणुकीत एकही उमेदवार निवडून न आल्याने भाजप सेना युतीने जिल्ह्यात भगवा फडकविला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या गडात फडकलेल्या भगव्याचे शिल्पकार केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे ठरले आहेत. पाचही विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान त्यांनी परिवारासह हजेरी लावल्याने हा विजय खेचून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर यांच्या पेक्षा संजय धोत्रे यांनी मारलेली बाजी ही आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे चित्र आहे.
भारिप बहुजन महासंघ तथा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्यातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. जिल्ह्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रभाव पाडत त्यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका काबीज करीत विधानसभेवर आमदारही पाठविले. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेनंतर जिल्ह्यातील भाजपला त्यांना टक्कर देता आली नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सेना युतीने विद्यमान चार आमदारांसह आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांना उभे करण्यात आले. अकोट आणि मूर्तिजापूर या दोन मतदारसंघात विद्यमान आमदारांना मतदार आणि पक्षातील नाराजीचा फटका बसला. मात्र, या दोन्ही आमदारांच्या प्रचारासाठी सोबतच बाळापुर मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी प्रचारादरम्यान यात्रेत विविध पदाधिकारी आणि नाराज गटांची बैठक घेऊन त्यांची समजूत काढली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांची पत्नी आणि मुलगा हे पण या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी फिरले. संजय धोत्रे यांच्यासाठी अस्तित्वाची असलेली ही लढाई त्यासोबतच प्रकाश आंबेडकर यांच्या ही शक्तिप्रदर्शनाला ऊर्जा देणारी ही निवडणूक या दोन्ही नेत्यांसाठी महत्वाची होती.
बाळापूर आणि मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघ या दोन्ही ठिकाणी भाजप-सेना युतीच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने चांगलीच टक्कर दिली. त्यासोबतच अकोट विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार प्रकाश भारसाखळे यांच्याविरोधातील रोष आपल्या बाजूने करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष रहाटे यांनी भरपूर प्रयत्न केले. परंतु, या विधानसभा मतदारसंघातील मत विभाजनाचा फटका वंचितला बसल्यामुळे प्रकाश भारसाखळे हे निवडून आले. अकोला पूर्वमधील लढत विद्यमान आमदार आणि संजय धोत्रे यांचे भाचे रणधीर सावरकर यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार हरिदास भदे यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार अशी चर्चा होती. परंतु, निकालानंतर ही लढत एकतर्फी झाली आणि रणधीर सावरकर हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले.
केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी विद्यमान आमदारांच्या चारही जागा सोबतच नव्याने असलेली बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अशा पाच उमेदवारांना निवडून आणण्यासाठी खेळलेली राजकीय खेळी ही खरी विजयासाठी महत्त्वाची ठरली. या निवडणुकीच्या निकालावरून जिल्ह्याच्या राजकारणावर प्रकाश आंबेडकर यांच्यापेक्षा संजय धोत्रे वरचढ ठरले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समित्या निवडणुकीमध्ये भाजपचीच बाजी मारेल, असा आशावाद आता व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा : अकोला : परतीच्या पावसाचा जोर वाढला; शेतकरी चिंताग्रस्त