अकोला - राज्यात महाबीजचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी हजारो शेतकऱ्यांनी केल्या होत्या. त्यामुळे आता महाबीजने तक्रारींचा निपटारा करण्यासाठी परत सोयाबीन किंवा बियाणे घेण्यास नकार देणाऱ्या शेतकऱ्यांना रकमेचा परतावा देण्यास सुरुवात केली आहे.
विविध वाणांचे 2.94 लाख क्विंटल सोयाबीन बियाणे राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी उपलब्ध करून दिले होते. मात्र, हजारो हेक्टरवरील बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी महाबीज व कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यांनतर राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर कृषीमंत्री दादा भुसे यांनी प्राप्त तक्रारींची त्वरित दखल घेऊन निवारण समितीच्या अहवालाची वाट न पाहता शेतकऱ्यांना दुबार पेरण्यकरता बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी आदेश देण्यात आला होता. त्यानुसार महामंडळामार्फत 3 हजार 250 क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. आतापर्यंत प्रत्यक्षात 610 शेतकऱ्यांनी 770 क्विंटल बियाणे 58 लाखांचे बियाणांची उचल केली. ज्या शेतकऱ्यांनी बियाणे घेण्यास नकार दिलासा अशा शेतकऱ्यांना बँक खात्याची माहिती घेऊन रक्कम टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत 19.12 लाख रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. विशेष म्हणजे, यांसदर्भात अकोला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालायातील गुणनियंत्रक अधिकारी नितीन लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात अद्यापपर्यंत कुठलीही माहिती नसल्याचे सांगितले आहे.