अकोला - इलेक्ट्रिक वायरने मुलाचा गळा आवळून खून करणाऱ्या बापाला जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे) ए. एस. जाधव यांच्या न्यायालयाने शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. किसनराव बढे असे आरोपीचे नाव आहे.
डाबकी रोड परिसरात राहणारे किसनराव बढे व मुलगा प्रदीप या दोघा बापलेकांत ११ सप्टेंबर २०१६ ला वाद झाला होता. प्रदीपची पत्नी गरोदर असल्याने प्रदीप स्वतंत्र खोली बांधून मागत होता. तर पिता किसनरावचा त्याला विरोध होता. किसनरावच्या मते त्यांची दुसरी पत्नी म्हणजेच प्रदीपची सावत्र आई प्रदीपच्या सततच्या भांडणाने घरून निघून गेली होती. त्यामुळे किसनराव आधीच त्रस्त होता. त्याच रात्री प्रदीपची पत्नी माहेरी असल्याने घरी दोघां बापलेकाशिवाय कोणीच नव्हते. प्रदीपचा काटा काढण्याची योग्य वेळ साधत किसनरावने आपल्या मुलाच्या गळ्याला वायर आवळली. त्यामुळे गळफास बसल्याने प्रदीपचा मृत्यू झाला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रदीपचा दारू पिल्याने मृत्यू झाल्याची माहिती प्रदीपच्या पत्नीला आणि बहिणीला कळवण्यात आली होती. इकडे मुलाच्या अंत्यसंस्काराचीही तयारी करून ठेवण्यात आली. मात्र, प्रदीपला अंतीम आंघोळ घालताना त्याच्या गळ्यावर व्रण दिसल्याने अनेकांना शंका आली. त्यानंतर प्रदीपच्या मित्रांनी लगेच ही बातमी पोलिसांना कळवली.
त्यानंतर जुने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळावर पोहोचले. त्यांना शंका आल्याने त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात नेला. तेथे शवविच्छेदन झाल्यानंतर प्रदीपचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाले. नंतर प्रदीपची पत्नी संगिताच्या तक्रारीवरून पोलिसांनी भा. दं. वि ३०२ नुसार गुन्हा दाखल करून तपास केला असता प्रदीपच्या वडिलानेच खून केल्याचे समोर आले.
पोलिसांनी आरोपी किसनरावला अटक करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने या खटल्यात ८ साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपी किसनरावविरुद्ध भा. दं. वि ३०२ नुसार जन्मठेपेची शिक्षा, १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिन्यांची शिक्षा ठोठावली. सरकारपक्षाच्यावतीने जिल्हा सहायक सरकारी वकील आनंद गोदे यांनी काम पाहिले.